तोंडरे येथे श्री राम लक्ष्मण सीता व हनुमान मंदिराचा सहावा वर्धापनदिन सोहळा
प्रभात पर्व न्यूज - Published: 14-Apr-2024 11:27 pmपनवेल : तळोजा एमआयडीसीतील तोंडरे याठिकाणी दिनांक १५ एप्रिल ते १८ एप्रिल दरम्यान श्री राम लक्ष्मण सीता व हनुमान मंदिराचा सहावा वर्धापनदिन सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यानिमित्त किर्तन, भजन, हरिपाठ याशिवाय पहाटे काकडा भजन, मुर्ती अभिषेक, सत्यनारायणाची महापूजा, पालखी सोहळा यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात दिनांक सोमवार १५ एप्रिल रोजी रात्री ७ ते ९ वाजता वेदांताचार्य ह.भ.प. पुरूषोत्तम महाराज बाविस्कर (बुलढाणा), मंगळवार १६ एप्रिल रोजी रात्री ७ ते ९ वाजता भागवताचार्य ह.भ.प. जगदीश महाराज जोशी (त्र्यंबकेश्वर ) यांचं किर्तन होणार आहे. बुधवारी १७ एप्रिल रोजी रामनवमीच्या निमित्ताने सकाळी १० ते १२ वाजता वेदांताचार्य ह.भ.प. नवनाथ महाराज राऊत (नगर) यांचं रामजन्माचं किर्तन होणार असून रात्री ७ ते ९ रोजी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कुऱ्हाडे महाराज (आळंदी ) यांचं किर्तन होणार आहे. गुरूवारी १८ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ वाजता ह.भ.प. भरत महाराज पाटील (जळगाव ) यांच्या काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहेत. पंचक्रोशीतील गुणीजन वारकरी भाविक भक्तांनी तसेच ग्रामस्थांनी या सोहळ्यात सहभागी श्रवणसुखाचा आनंद घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक, माजी सरपंच राम महादू पाटील आणि कुटुंबियांनी केले आहे.