पनवेल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ह.भ.प. गोकुळशेठ पाटील यांचे निधन
प्रभात पर्व न्यूज - Published: 16-Feb-2024 03:04 pmकळंबोली : पनवेलमधील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ह.भ.प. गोकुळशेठ पाटील यांचे आज (दि .१६ फेब्रुवारी) वयाच्या ८५ वर्षी निधन झाले. गोकुळशेठ पाटील यांनी जवळपास १५ वर्ष पनवेल तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. गोकुळशेठ हे पनवेल शहर काँग्रेस कमेटी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांचे वडील असून कॉंग्रेसचे 'निष्ठावंत' म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पश्चात चार मुले व एक मुलगी तसेच सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रोडपाली येथील ह.भ.प. गोकुळशेठ पाटील यांचा राजकारणासह पारमार्थिक कार्यक्रमात विशेष सहभाग असायचा. मनमिळाऊ स्वभाव, गावातील गरजू , गरीब लोकांना नेहमीच मदतीचा हात दिला. गावातील लहानापासून मोठ्यापर्यंत त्यांच्या प्रति आदर होता. रोडपाली गावच्या स्मशानभूमीवर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध पक्षातील नेते, कार्यकर्त्यांसह सामाजिक, परमार्थिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.