तळोजा एमआयडीसीतील परफॉर्मन्स केमिसर्व कंपनीमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे तोंडरे ग्रामस्थ हैराण
प्रभात पर्व न्यूज - Published: 17-Feb-2024 11:20 amतळोजा : तळोजा एमआयडीसीतील 'परफॉर्मन्स केमिसर्व लिमिटेड' या कंपनीमधून खूप मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असून रात्रीच्या वेळेला तोंडरे गावातील नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. याबाबत शिवसेनेचे तोंडरे येथील उपशाखाप्रमुख वासुदेव पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली असून तक्रारीची प्रत तळोजा पोलीस स्टेशनमध्ये सादर केली आहे. कंपनीतून येणारा आवाज रात्रभर चालू असतो. त्यामुळे ग्रामस्थांना विशेषतः लहान मुले, वृध्द तसेच गरोदर महिलांना याचा मोठा त्रास होत असल्याचा आरोप, या पत्राद्वारे करण्यात आला आहे.
याबाबत वारंवार तक्रारी करून देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात कुठलीही कारवाई येत नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दररोज रात्री मोठ्या प्रमाणात हा आवाज होत असल्याने नागरिकांना झोपचाही त्रास होत आहे. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कंपनी विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, संबंधित कंपनी व्यवस्थापनाला विचारले असता त्यांनी सांगितले की, "कंपनीचा प्लांट ट्रीप झाल्यानंतर स्टार्टअपच्या वेळीच असा आवाज येत असतो. हा आवाज थोड्या काळासाठीच असतो आणि कुठल्याही पद्धतीने धोकादायक नाही. असे असले तरी, त्यामध्ये आम्ही यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला वेळोवेळी माहिती देत आहोत. असा प्रकार रात्रीच्या वेळी झाल्यास नागरिकांना याचा त्रास कमी जाणवेल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत." असे कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे
.