नैना परिक्षेत्रात युडीसीपीआर लागू करण्याबाबत शासन सकारात्मक - मंत्री उदय सामंत
प्रभात पर्व न्यूज - Published: 12-Feb-2024 06:42 pmनवी मुंबई : सिडको नैना परिक्षेत्रातील गावांना एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली (युडीसीपीआर) लागू करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज (सोमवार, दि. १२) कोकणभवन येथे दिले.
सिडको अंतर्गत नैना परिक्षेत्रात शासनाकडून मंजूर युडीसीपीआरच्या तरतुदी तातडीने लागू करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. त्या संदर्भात सीबीडी बेलापूर येथे कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयात नैना परिक्षेत्रातील समस्यांबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. त्या वेळी मंत्री सामंत बोलत होते. या बैठकीस आमदार जयंत पाटील, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, माजी आमदार बाळाराम पाटील, उद्योजक जे.एम. म्हात्रे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, सरपंच आणि संबंधित शासकीय अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्राकरिता नैना विशेष नियोजन प्राधिकरण सिडकोने निर्माण केले आहे. या अधिसूचित क्षेत्रात पनवेल, उरण व पेण तालुक्यातील १७५ गावांचा समावेश आहे. नैना अधिसूचित क्षेत्रामध्ये २३ गावांची अंतरिम प्रारूप विकास योजना शासनाने यापूर्वीच मंजूर केली आहे. उर्वरित १५२ गावांची प्रारूप विकास योजना १६ सप्टेंबर २०२२ रोजीच्या अधिसूचनेनुसार मंजूर झाली आहे. नैना परिक्षेत्रात युडीसीपीआर लागू झाल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील, असे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, जासई येथील महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठानच्या निवेदनाच्या अनुषंगानेही पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अतुल पाटील आणि पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक विचार करेल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.