गुढीपाडवा अर्थात हिंदूंच्या नववर्षदिनाचे महत्त्व !
प्रभात पर्व न्यूज - Published: 08-Apr-2024 10:16 pmहिंदू धर्मात गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा हिंदूंचा नववर्षारंभ. याच दिवशी सृष्टीची निर्मिती झाली म्हणून हा केवळ हिंदूंचाच नव्हे तर अखिल सृष्टीचा नववर्षारंभ आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत. या लेखात गुढीपाडव्याचे महत्त्व तसेच या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती समजून घेऊया.
गुढीपाडवा म्हणजेच वर्ष प्रतिपदा !
१. तिथी : युगादी तिथी, चैत्र शुद्ध प्रतिपदा
२. वर्षारंभ : चैत्र शुद्ध प्रतिपदाच का ? : याचा प्रथम उद्गाता ‘वेद’ आहे. वेद हे अतीप्राचीन वाङ्मय आहे, याबद्दल दुमत नाही. ‘द्वादशमासैः संवत्सरः ।’ असे वेदात म्हटले आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. वर्षारंभाचा प्रारंभ दिवस ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा आहे.तसेच चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास अर्थात गुढीपाडवा साजरा करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत.
अ. गुढीपाडवा : नैसर्गिक महत्त्व -
वसंत ऋतूच्या प्रारंभाचा दिवस : ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंतसंपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) आणि वसंत ऋतू चालू होतो. सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.
आ. गुढीपाडवा : ऐतिहासिक महत्त्व -
रामाने वालीचा वध केल्याचा दिवस : रामाने वालीचा वध या दिवशी केला.
ज्या दिवशी राम रावणवधानंतर आयोध्येला परत आला, त्या दिवशी रामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी (ब्रह्मध्वज) उभारली होती. विजयाचे प्रतीक हे उंच असते, म्हणून गुढी उंच उभी केली जाते.
शालिवाहन शक चालू झाल्याचा दिवस ! : शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळविला तोही हाच दिवस अर्थात् गुढीपाडवा. या दिवसापासूनच शालिवाहन शक सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळविला.
ही गुढीपाडवा हा वर्षारंभ साजरा करण्यामागील ऐतिहासिक कारणे आहेत.
इ. गुढीपाडवा : आध्यात्मिक महत्त्व -
सृष्टीची निर्मिती म्हणजेच सत्ययुगाच्या प्रारंभाचा दिवस : ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.
गुढीपाडवा हा पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन : ‘गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित झालेली असते.निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात. याचा विचार करता आपण गुढीपाडवा हाच नववर्षारंभ साजरा करायला हवा.
३. गुढीपाडवा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक : गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतो; या दिवशी मात्र मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.
४. प्रत्येक पाऊल समृद्धीकरता पुढे टाकण्याची शिकवण देणारी चैत्र शुक्ल प्रतिपदा ! : उत्तरायणातील वसंतऋतूतील चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला शुभसंकल्पाची गुढी उभारायची असते. गुढीपाडवा हे संकल्पशक्तीचे गुढत्व दर्शवते. ‘आमचे प्रत्येक पाऊल आमच्या समृद्धीकरिता आता पुढेच पडत राहील’, असे प्रतिप्रदा सांगते; म्हणून या दिवशी शुभसंकल्प केल्यास, तो संकल्प आपल्या जीवनाला फलदायी होतो. याकरिताच सत्यसंकल्परूपी गुढीची मुहूर्तमेढ रोवायची असते. – परात्पर गुरु परशराम माधव पांडे महाराज
५. हिंदु संस्कृतीची प्राचीनता !
२०२४ या वर्षाच्या गुढीपाडव्याला हिंदु धर्माच्या कालगणनेनुसार १५ निखर्व, ५५ खर्व, २१ अब्ज, ९६ कोटी ८ लक्ष ५३ सहस्र १२६ व्या वर्षाचा आरंभ होत आहे.
टीप : १ खर्व म्हणजे १०,००,००,००,००० वर्षे (शंभर सहस्र लक्ष किंवा लक्ष लक्ष वर्षे), तर १ निखर्व म्हणजे १,००,००,००,००,००० वर्षे (दहा सहस्र कोटी वर्षे)
६. गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाच्या धार्मिक कृती :
धर्मात सांगितलेल्या पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्या धार्मिक कृतींची माहिती घेऊया.
अभ्यंगस्नान (मांगलिक स्नान) - गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करण्यास सांगितले आहे. अभ्यंगस्नान करतांना देशकालकथन करतात.
तोरण लावणे - स्नानानंतर आम्रपल्लवांची तोरणे सिद्ध करून प्रत्येक द्वाराशी लाल फुलांसहित बांधावी; कारण लाल रंग शुभदर्शक आहे.
पूजा - प्रथम नित्यकर्म देवपूजा करतात. ‘वर्षप्रतिपदेला महाशांती करायची असते. शांतीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाची पूजा करतात; कारण या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केलीया दिवशी जो वार असेल, त्या वाराच्या देवतेचीही पूजा करतात.
गुढी उभारणे - या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून सूर्योेदयाच्या वेळी शास्त्रशुद्ध गुढी उभारली जाते.
दान - याचकांना अनेक प्रकारची दाने द्यावीत, उदा. पाणपोईद्वारा उदकदान. याने पितर संतुष्ट होतात. ‘धर्मदान’ हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असे शास्त्र सांगते. सध्याच्या काळात धर्मशिक्षण देणे, ही काळाची आवश्यकता आहे.
पंचांगश्रवण - ज्योतिषाचे पूजन करून त्याच्याकडून किंवा उपाध्याकडून नूतन वर्षाचे पंचांग अर्थात् वर्षफल श्रवण करतात.
कडुनिंबाचे मिश्रण - पंचागश्रवणानंतर कडुनिंबाचे मिश्रण वाटायचे असते. या चूर्णामध्ये कडुलिंबाची पाने, फुले, मिरी, हिंग, मीठ, ओवा, साखर इत्यादी पदार्थ चूर्ण करून ते चिंचेत कालवून भक्षण करावे. जो यजमान आहे त्याला ते रोगशांती, व्याधींचा नाश व्हावा आणि सुख, विद्या, आयुष्य, लक्ष्मी (संपत्ती) लाभावी म्हणून भक्षण करण्यास सांगितले आहे. (संदर्भ आणि हे बनविण्याचा विधी हे प्रती संवत्सराच्या पंचागामध्ये उधृत केलेले असते.)
भूमी (जमीन) नांगरणे - या दिवशी भूमीत नांगर धरावा. नांगरण्याच्या क्रियेने खालची माती वर येते. मातीच्या सूक्ष्म कणांवर प्रजापतिलहरींचा संस्कार होऊन बीज अंकुरण्याची भूमीची क्षमता अनेक पटींनी वाढते. शेतीची अवजार अन् बैल यांवर प्रजापति लहरी उत्पन्न करणार्या मंत्रासह अक्षता टाकाव्यात.
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !
सर्वेऽत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॥
अर्थ : पृथ्वीवरील सर्व जीव सुखी आणि निरामय (रोगमुक्त) होवोत. सर्वांचे कल्याण होवो. सर्वांची एकमेकांकडे पहाण्याची दृष्टी शुभ आणि कल्याणमय असो आणि कोणाच्याही वाटेला दुःख न येवो. तेव्हा वर वर्णन केल्याप्रमाणे या गुढीपाडव्याच्या दिवशी सत्य संकल्पाची, तो प्रत्यक्षात यावी; म्हणून कृतीशील भक्तीसाठी मूर्त स्वरूप अशा गुढीची मुहूर्तमेढ आनंदाने करून म्हणूया,
‘ॐ शांति: शांति: शांति: ।’
संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
स्थानिक संपर्क क्र.: 9920015949