स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ओवळे ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वाराला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नावाचे नामफलक
प्रभात पर्व न्यूज - Published: 15-Aug-2023 02:30 pmपनवेल : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ओवळे ग्रामपंचायतीमार्फत गावाच्या प्रवेशद्वाराला प्रकल्पग्रस्तांचे भाग्यविधाते, लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देऊन नामफलकाचे अनावरण करण्यात आले. विमानतळ प्रकल्पबाधित असलेल्या आपल्या २७ गावामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे दिबांचे नाव देऊन नामफलकाचे अनावरण करण्यात आले आहे. गावच्या सरपंच ॲड. रेश्मा अमित मुंगाजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नामफलकावर, समाजाचा प्रतीक म्हणून आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचा चिन्ह लावण्यात आले असून याद्वारे सर्वांनी एकत्र येऊन समाज संघटित करून समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच काम करण्याचा संदेश दिला आहे.
याप्रसंगी नामफलकाचे अनावरण करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते दि.बा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील उपस्थिती लाभली. याशिवाय आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रूपेश धुमाळ, २७ गाव प्रकल्पबाधित कृती समितीचे सचिव प्रेम पाटील, ग्रामपंचायत कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वास्कर, पारगावचे माजी सरपंच महेंद्र पाटील यांच्यासह ओवळे ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या गावातील भूमिपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, येणाऱ्या काळात प्रत्येक गावात, प्रत्येक चौकात लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा नामफलक लावून त्यांच्या गौरवशाली कार्याचा इतिहास सांगण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.