घोट येथील भाजचे युवा नेते नितेश पाटील यांच्या मध्यस्थीने सुटला स्थानिक कामगारांचा प्रश्न
प्रभात पर्व न्यूज - Published: 16-Jul-2023 10:02 pmतळोजा : प्रभाग १ चे भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष नितेश पाटील यांच्या यशस्वी मध्यस्थीने सीएचटी (इंडिया) लिमिटेड या कंपनीत काम करणाऱ्या स्थानिक कामगारांचा प्रश्न सुटला असून याबाबत त्यांचा कामगारांकडून सत्कार करण्यात आला आहे. तळोजा एमआयडीसीत घोट गावालगत असलेल्या या कंपनीत काम करणारे स्थानिक कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी वाद सुरू झाला होता. प्रकरण मिटत नसल्याने वाद चिघळला आणि कंपनी व्यवस्थापनाकडून संबंधित कामगारांवर धीम्या गतीने उत्पादन काढल्याचा ठपका ठेवण्यात आला. याप्रकरणी कंपनीतील बाळाराम पाटील, प्रशांत दारावकर, शरद पाटील, श्रवण पावशे या कामगारांवर, कंपनी व्यवस्थापनाकडून तब्बल चार कोटी रुपयांचा नुकसान केल्याचा आरोप करत नोटीसा बजावण्यात आल्या. शिवाय त्यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून महिनाभर त्या कामगारांना घरी बसवण्यात आले.
संबंधित कामगारांनी याप्रकारणी भाजपचे युवा नेते व अथर्व इंटरप्रायजेसचे नितेश पाटील यांच्याकडे धाव घेत आपली समस्या मांडली. नितेश पाटील यांच्या विनंतीवरून तळोजा पोलीस स्टेशनचे तत्कालीन वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या उपस्थितीत कंपनी व्यवस्थापनाची बैठक बोलावण्यात आली. यावेळी नितेश पाटील यांनी कामगारांची बाजू मांडल्यानंतर सर्व संमतीने तोडगा काढण्यात आला आणि कामगारांना बारा हजारांची पगारवाढ मिळाली तसेच कंपनीचे नुकसान भरून काढण्यासाठी एक तास जास्त काम करून कंपनीला सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. तीन-चार बैठकीनंतर नुकताच यासंदर्भात लेखी करार होऊन हा प्रश्न निकाली निघाला आहे. आपला प्रश्न सुटून न्याय मिळाल्याने संबंधित चार कामगारांसह कंपनीतील सर्व कामगारांनी नितेश पाटील यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, स्थानिक कामगारांनी कामचुकारपणा न करता कंपनीचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन करतानाच, कंपनीकडून कुठल्याही प्रकारचा अन्याय झाल्यास सदैव तुमच्या पाठीशी उभा रहीन, असे आश्वासन नितेश पाटील यांनी यावेळी दिले.