लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रमुख जाहीर; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे 'मावळ'ची जबाबदारी
प्रभात पर्व न्यूज - Published: 08-Jun-2023 04:46 pmमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत असून त्यासाठी सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्य आहेत. यामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय रायगडची जबाबदारी सतिश धारप यांच्याकडे तर विनय सहस्रबुद्धे यांच्याकडे ठाणे लोकसभा आणि शशिकांत कांबळे यांच्याकडे कल्याण लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षीय संघटनेत एकवाक्यता आणण्यासाठी तसेच नियोजनबद्ध कार्यकम राबवण्यासाठी आज (गुरूवार, ८ जून) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या आहेत. विशेष म्हणजे युतीतील मित्रपक्ष शिवसेनेचे खासदार असणाऱ्या मतदारसंघात देखील नियुक्त्या करण्यात आल्या असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीला विजय मिळवून देतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात भाजपकडून ‘मिशन ४५ +’ चा नारा देण्यात आला आहे. राज्यामध्ये विरोधी पक्षांची महाविकास आघाडीच्या माध्यमातून असणारी वज्रमूठ पाहता भाजपला बरेच मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे निवडणुकीला १० महिन्यांचा कालावधी शिल्लक असतानाच केंद्रीय स्तरावरून रणनीती आखण्यात येत आहे. मतदारसंघात पक्षातील नेते, वेगवेगळे सेल तसेच राज्य स्तरावर समन्वय ठेवण्यासाठी लोकसभा प्रमुखांची नेमणूक करण्यात आली आहे.