रोडपालीतील रस्ता बंद, डम्पिंग ग्राउंड व नागरी समस्यांविरोधात ३० जूनला पनवेल महापालिकेवर भव्य मोर्चा

🕒 21-06-2026 12:51 PM | Prabhat Parv News

कळंबोली : रोडपाली गावातील सेक्टर १६-ई येथील प्लॉट क्रमांक ९१ सिडकोने बिल्डरांना विकून गावाचा पारंपरिक रस्ता बंद केल्याचा आरोप तसेच सेक्टर १२ मधील म्हससर देवस्थान तलावालगतच्या रहिवासी भागात डम्पिंग ग्राउंड उभारण्याच्या प्रस्तावाविरोधात येत्या ३० जून रोजी सकाळी ११ वाजता पनवेल महानगरपालिकेवर पक्षविरहित भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील आणि माजी महिला व बालकल्याण सभापती विद्या गायकवाड यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

                पत्रकार परिषदेत बोलताना या नेत्यांनी पनवेल महानगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर गंभीर आरोप करत नागरिकांच्या विविध प्रश्नांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. रोडपाली परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांबरोबरच महावितरणचा सावळागोंधळ, वारंवार होणारी वीज खंडिती, अवाजवी वीज बिले, ग्राहकांची अडवणूक, पाणीटंचाई, खराब रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव अशा अनेक प्रश्नांवर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला.

                यावेळी बोलताना जगदीश गायकवाड यांनी सांगितले की, रोडपाली येथील म्हससर देवस्थान तलाव परिसर हा नागरिकांसाठी महत्त्वाचा सार्वजनिक परिसर आहे. तलावासमोर गावचे देवस्थान असून परिसरात मोठ्या प्रमाणात निवासी वसाहती आहेत. सकाळ-संध्याकाळ ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले या परिसरात फिरण्यासाठी येत असतात. अशा ठिकाणी डम्पिंग ग्राउंड उभारल्यास दुर्गंधी, प्रदूषण आणि आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच नियमानुसार डम्पिंग ग्राउंड हे नागरी वसाहतींपासून किमान ५०० मीटर अंतरावर असणे आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला.

                जगदीश गायकवाड यांनी सिडकोवरही निशाणा साधत रोडपाली गावातील सेक्टर १६-ई, प्लॉट क्रमांक ९१ बिल्डरांना विकण्यात आल्याने गावाचा महत्त्वाचा रस्ता बंद झाल्याचे सांगितले. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली. या दोन्ही प्रश्नांसह इतर नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ३० जून रोजी पनवेल प्रांत कार्यालयापासून पनवेल महानगरपालिकेपर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

      यावेळी पनवेल काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी हा मोर्चा पूर्णपणे पक्षविरहित असल्याचे सांगत सर्व नागरिक, सामाजिक संघटना तसेच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. त्यांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधींवरही टीका करत प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यातील साटेलोट्यामुळे नागरिकांचे प्रश्न दुर्लक्षित राहत असल्याचा आरोप केला. "आज महापालिकेत प्रशासनापेक्षा सत्ताधाऱ्यांकडूनच अधिक भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. अनेक कंत्राटदार टक्केवारीच्या व्यवहारांबाबत तक्रारी करत आहेत. योग्य वेळी ऑडिओ आणि व्हिडिओ पुराव्यांसह सार्वजनिकरित्या एलसीडी स्क्रीनवर हे सर्व समोर आणून भांडाफोड करू," असा इशाराही सुदाम पाटील यांनी दिला.

           पत्रकार परिषदेत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पनवेलकरांच्या ज्वलंत प्रश्नांबाबत जनतेत तीव्र असंतोष असल्याचे सांगितले. या मोर्चातून नागरिकांचा आक्रोश व्यक्त होणार असून मोठ्या प्रमाणावर युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होतील, असा दावा करण्यात आला. ३० जून रोजी ऐन पावसाळी अधिवेशन काळात पनवेलमध्ये होणाऱ्या या मोर्चाकडे आता पनवेलकरांसह राजकीय व प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून रोडपालीतील डम्पिंग ग्राउंड आणि रस्ता बंदच्या मुद्द्यावर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Comments

जुन्या वादातून चालकाची हत्या; तळोजा पोलिसांकडून ४४ तासांत आरोपीला गुजरातमधून अटक
24 Jul 2026
गुरूंचे आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व
22 Jul 2026
बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे कळंबोली पोलिसांचे आवाहन
13 Jul 2026
मनीष वैती यांची 'शिवसेना प्रणित नवक्रांती कामगार नाविक सेना'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती
09 Jul 2026
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका अलर्ट मोडवर; ४३५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
05 Jul 2026
वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व : जाणून घ्या धार्मिक श्रद्धा आणि पूजन पद्धती
28 Jun 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती
24 Jun 2026
रोडपालीतील रस्ता बंद, डम्पिंग ग्राउंड व नागरी समस्यांविरोधात ३० जूनला पनवेल महापालिकेवर भव्य मोर्चा
21 Jun 2026
तळोजा गुन्हे प्रकटीकरण पथकाची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये घरफोडीचे ८ गुन्हे उघडकीस
19 Jun 2026