पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती

🕒 24-06-2026 05:14 AM | Prabhat Parv News

पंढरपूर : कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूर येथील दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तात्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत, न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारचे लेपन करण्यास मनाई केली आहे.

          वारकरी संप्रदाय, श्री बाळकृष्ण डिंगरे आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पुरुषोत्तम (गणेश) लंके यांनी पंढरपूर येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती सोनाली राऊळ यांच्या न्यायालयात हा दावा दाखल केला होता. या प्रकरणी याचिकाकर्त्यांच्या वतीने अधिवक्ता सुधीर रानडे यांनी भक्कम युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने मंदिर समितीला वज्रलेप न करण्याविषयी सक्त ताकीद दिली आहे.

     न्यायालयात मांडण्यात आलेले महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये हिंदु धर्मशास्त्रानुसार मूर्ती ही केवळ दगडी किंवा पाषाण शिल्प नसून त्यात साक्षात देवत्व (प्राण) असते. काकड आरतीपासून ते नैवेद्यापर्यंत सर्व कृती याच भावनेतून केल्या जातात. मंदिर समिती केवळ 'दगडाची मूर्ती' समजून कृत्रिम आणि अपवित्र रासायनिक पदार्थांचा (उदा. इपॉक्सी) वापर करत आहे, ज्यामुळे मूर्तीचे देवत्व नष्ट होऊ शकते. आतापर्यंत ४ वेळा रासायनिक लेपन करूनही त्याचा फोलपणा सिद्ध झाला आहे. कृत्रिम रसायनांमुळे पाषाणाचे नैसर्गिक श्वसन रोखले जाऊन मूर्ती आतून अधिक ठिसूळ होण्याचा मोठा धोका आहे. 'महाकालेश्वर मंदिर' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा न्यायालयात संदर्भ देण्यात आला. यानुसार भक्तांच्या धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही निर्णय प्रशासनाला घेता येणार नाहीत. करवीर पीठाच्या जगद्गुरु शंकराचार्यांनी या रासायनिक लेपनास स्पष्ट विरोध करणारे पत्र दिले असून, न्यायालयाने त्याचीही नोंद घेतली आहे.

     या निर्णयावर समाधान व्यक्त करताना महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, तब्बल २८ युगे विटेवर सुखरूप उभा असणाऱ्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायाला कोरोना टाळेबंदीच्या काळात खड्डा कसा पडला आणि श्री रुक्मिणीमातेचे पाय का खराब झाले? याचे कोणतेही शास्त्रीय उत्तर अद्याप मंदिर समिती किंवा पुरातत्त्व विभागाला देता आलेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केवळ मते नोंदवली गेली; मात्र कोणती रसायने वापरणार आणि संवर्धन कसे करणार याची कोणतीही स्पष्ट माहिती प्रशासनाने दिली नाही. अचानक पत्रक काढून मंदिर बंद ठेवत वज्रलेपाचा निर्णय जाहीर केल्याने भाविकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. मूर्ती संवर्धनासाठी 'आयुर्वेदिक वज्रलेप' हा अधिक सुरक्षित आणि परंपरेस अनुरूप असल्याचे आम्ही न्यायालयात सप्रमाण मांडले आहे. यापुढील काळात तरी मंदिर समिती वारकरी, धर्माचार्य, संत-महंत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या भावनांचा आदर करेल, अशी आम्हाला आशा आहे.


Leave a Comment

Comments

कळंबोली पोलिसांकडून बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे आवाहन
07 Aug 2026
जुन्या वादातून चालकाची हत्या; तळोजा पोलिसांकडून ४४ तासांत आरोपीला गुजरातमधून अटक
24 Jul 2026
गुरूंचे आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व
22 Jul 2026
बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे कळंबोली पोलिसांचे आवाहन
13 Jul 2026
मनीष वैती यांची 'शिवसेना प्रणित नवक्रांती कामगार नाविक सेना'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती
09 Jul 2026
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका अलर्ट मोडवर; ४३५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
05 Jul 2026
वटपौर्णिमा व्रताचे महत्त्व : जाणून घ्या धार्मिक श्रद्धा आणि पूजन पद्धती
28 Jun 2026
पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती
24 Jun 2026
रोडपालीतील रस्ता बंद, डम्पिंग ग्राउंड व नागरी समस्यांविरोधात ३० जूनला पनवेल महापालिकेवर भव्य मोर्चा
21 Jun 2026