कोकण विधान परिषदेसाठी अनिकेत तटकरे, बाळ माने यांच्यासह एकूण सहा जण रिंगणात

🕒 02-06-2026 09:03 AM | Prabhat Parv News

रत्नागिरी : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिकेत तटकरे यांनी सोमवारी रत्नागिरी येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी एकजूट दाखवत मोठी उपस्थिती लावली. यावेळी खासदार सुनील तटकरे, मंत्री उदय सामंत, मंत्री आदिती तटकरे, आमदार दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रमोद जठार, आमदार शेखर निकम, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महायुतीच्या विकासाभिमुख विचारांना आणि जनतेच्या विश्वासाला बळ देणाऱ्या या निवडणुकीत अनिकेत तटकरे यांना निश्चितच मोठे यश मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

      विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी पाच प्रमुख उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे आपले अर्ज दाखल केले. यापूर्वी दाखल झालेल्या एका अर्जासह आता निवडणुकीच्या रिंगणात एकूण ६ उमेदवार आमनेसामने आले आहेत. मात्र, महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूंच्या मित्रपक्षांनी आणि नेत्यांनी अपक्ष शड्डू ठोकल्यामुळे या निवडणुकीत 'आघाडी धर्म' पाळला जाणार की बंडखोरी उफाळून येणार, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

     या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनिकेत तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत मैदानात शड्डू ठोकला आहे, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज भरून तगडे आव्हान उभे केले आहे. उबाठाचे आमदार भास्‍कर जाधव, माजी जि.प. अध्‍यक्ष विक्रांत जाधव व प्रमुख पदाधिकारी त्‍यांचा अर्ज भरण्‍यासाठी उपस्‍थित होते. महाविकास आघाडीत घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने ॲड. मानसी म्हात्रे यांनी अर्ज भरला आहे, तर अरविंद म्हात्रे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, महायुतीमध्येही मोठी खळबळ उडाली असून, शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली महेंद्र दळवी यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष अर्ज दाखल केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याशिवाय अलिबाग येथील अनिल चोपडा यांनीही अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीत रंगत वाढवली आहे.

       सध्या तरी रिंगणात सहा उमेदवार दिसत असले तरी येत्या ४ जून रोजी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे या तारखेकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. महाविकास आघाडीतील शेकाप आपले उमेदवार मागे घेणार का, तसेच महायुतीतील आमदार महेंद्र दळवी आपल्या कन्येची मनधरणी करून तिचा अर्ज मागे घ्यायला लावणार का, हे ४ जूनलाच स्पष्ट होईल. बंडखोरांनी माघार घेतली नाही तर अनिकेत तटकरे आणि बाळ माने यांच्यातील थेट लढत अधिक आव्हानात्मक आणि चुरशीची बनणार आहे. त्यामुळे ४ जूननंतरच कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रणधुमाळीचे खरे चित्र स्पष्ट होईल.

Leave a Comment

Comments

श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व आणि श्रीकृष्णाची उपासना
03 Sep 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व आणि श्रीकृष्णाची उपासना
03 Sep 2026
शिवसेना शिष्टमंडळाकडून प्रत्यक्ष सर्वेक्षण; आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत गंभीर प्रश्न उपस्थित
01 Sep 2026
डान्सबारच्या मुद्द्यावर पनवेलचेच नाव‌ का?
31 Aug 2026
तळोजे मजकूर येथील ह.भ.प. जयश्री ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
28 Aug 2026
प्रसिद्ध लावणी कलाकार अश्मित कामठे यांच्या उपस्थितीत प्रगती फाउंडेशनची ‘मंगळागौर २०२६’ स्पर्धा उत्साहात
09 Aug 2026
कळंबोली पोलिसांकडून बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे आवाहन
07 Aug 2026
जुन्या वादातून चालकाची हत्या; तळोजा पोलिसांकडून ४४ तासांत आरोपीला गुजरातमधून अटक
24 Jul 2026
गुरूंचे आणि गुरुपौर्णिमेचे महत्त्व
22 Jul 2026