शिवसेना शिष्टमंडळाकडून प्रत्यक्ष सर्वेक्षण; आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत गंभीर प्रश्न उपस्थित
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या डासजन्य आजारांसह स्वाईन फ्लूचा वाढता धोका लक्षात घेता महापालिका प्रशासनाने केवळ कागदोपत्री उपाययोजनांपुरते मर्यादित न राहता तातडीने ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत शिवसेना पनवेल विधानसभा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच खासगी रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण करून वाढत्या आजारांबाबत माहिती संकलित केली.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पनवेल परिसरात अधूनमधून पाऊस, त्यानंतर कडक ऊन आणि मध्येच थंड वारे असे बदलते हवामान अनुभवास येत आहे. हे वातावरण डासजन्य तसेच विविध संसर्गजन्य आजारांच्या प्रसारासाठी पोषक ठरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या सर्वेक्षणात डेंग्यू आणि मलेरियाच्या संशयित रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे तसेच काही ठिकाणी मलेरिया तपासणीच्या प्रक्रियेत त्रुटी असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन वाढत्या आजारांबाबत सविस्तर माहिती मांडली. उपायुक्त वैभव विधाते यांच्या पुढाकाराने डासजन्य आजारांबाबत आयोजित आढावा बैठकीत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती, नागरिकांच्या समस्या तसेच आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. बैठकीस उपायुक्त अभिषेक पारडकर, क्षयरोग अधिकारी तथा वैद्यकीय आरोग्य अधिकारी (प्रभारी) डॉ. उषा राठोड, महामारी तज्ज्ञ डॉ. आकाश थसाळे, आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे, मुख्य आरोग्य निरीक्षक संजय जाधव, पर्यवेक्षक बळीराम गवाडे आणि पर्यवेक्षक धनंजय म्हात्रे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. शिवसेनेच्या शिष्टमंडळात महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, महानगर संघटक-पनवेल विधानसभा मंगेश रानवडे, खारघर शहर समन्वयक प्रणव कारखानीस आणि विभाग संघटिका ज्योती नाडकर्णी यांचा समावेश होता.
मलेरिया तपासणीतील त्रुटींवर आक्षेप
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मलेरिया चाचणीच्या उपलब्धतेबाबत तसेच तपासणी प्रक्रियेतील काही त्रुटी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. डासजन्य आजारांचा वाढता धोका लक्षात घेता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक तपासणी सुविधा, पुरेसे मनुष्यबळ आणि प्रतिबंधात्मक यंत्रणा सक्षम करण्याची गरज असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले.
स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रसाराबाबत सवाल
पनवेल विधानसभा क्षेत्रात स्वाईन फ्लूचा प्रसार वाढत असल्याचे पुराव्यानिशी महापालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचा दावा शिवसेनेने केला. स्वाईन फ्लूच्या पार्श्वभूमीवर वेळेत तपासणी, संशयित रुग्णांचे निदान, आवश्यक उपचार व्यवस्था आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
महापालिकेकडून महत्त्वाच्या उपाययोजनांचे आश्वासन
शिवसेनेने उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर महापालिका आरोग्य विभागाने पुढील उपाययोजना तातडीने करण्याचे आश्वासन दिले.
१. मलेरिया तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ :
मलेरिया टेस्टिंगची सुविधा अधिक प्रभावीपणे आणि आक्रमक पद्धतीने वाढविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
२. धुरीकरण व फवारणीची वारंवारता वाढविणे :
धुरीकरण व फवारणीची फ्रिक्वेन्सी वाढविण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव लवकरच सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार आहे.
३. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वाईन फ्लू तपासणी :
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वाईन फ्लूची तपासणी सुविधा लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले.
१५ सप्टेंबरपर्यंत अंमलबजावणी करा; अन्यथा आंदोलन
पनवेल महापालिका प्रशासनाने बैठकीत दिलेल्या सर्व आश्वासनांची १५ सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी, अशी स्पष्ट मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. या मुदतीपर्यंत उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या नाहीत किंवा प्रशासनाकडून चालढकल करण्यात आली, तर नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. डेंग्यू, मलेरिया आणि स्वाईन फ्लूचा वाढता धोका रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने मैदानात उतरून ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने व्यक्त केली.