शिक्षणव्यवस्था वाचवण्यासाठी पनवेलमध्ये ‘शाळा वाचवा’चा नारा
पनवेल : सार्वजनिक शिक्षणव्यवस्था वाचवण्यासाठी तसेच सर्वांसाठी समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या मागणीसाठी पनवेल येथे ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ परिषद उत्साहात पार पड8ली. मुंबईतील ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली ही महाराष्ट्रातील आठवी परिषद होती.
या परिषदेत मार्गदर्शन करताना लेखिका दीपा पवार यांनी शिक्षण आणि लोकशाहीचे ‘बोन्सायकरण’ थांबवण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या विचारशक्ती, जिज्ञासा आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वावर मर्यादा घालून त्यांची सर्वांगीण वाढ खुंटवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणव्यवस्था समताधिष्ठित, सर्वसमावेशक आणि विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करणारी असावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सत्यशोधक शिक्षक सभेचे माजी अध्यक्ष रमेश बिजेकर, माजी विधानपरिषद सदस्य बाळाराम दत्तात्रेय पाटील, ॲड. रोशन पाटील, विवेक भोपी, लीलाधर भोईर यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेत कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेणे, प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र शिक्षक नियुक्त करणे, गाव, तांडा, वाडी व वस्त्यांमध्ये शाळा उपलब्ध करून देणे, तसेच १५ मार्च २०२४चा शासननिर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली. सरकारी महाविद्यालये बंद न करता उच्च शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे धोरण राबवावे, केजी ते पीजीपर्यंत मोफत, गुणवत्तापूर्ण व समान शिक्षण द्यावे आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या १० टक्के खर्च शिक्षणावर करावा, अशा मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या.
मुंबई येथे ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनात शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन परिषदेत करण्यात आले.