संगीत क्षेत्राचा आधार हरपला!

🕒 27-10-2026 03:30 PM | Prabhat Parv News

खारघर : कोपरा गावचे संगीतप्रेमी, कलाकारांचे आश्रयदाते आणि कृतिशील माजी सरपंच धर्माशेठ रामा तोडेकर यांचे मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. कोपरा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भजनक्षेत्रातील गायक, वादक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या निधनाने कोपरा गावासह परिसरातील संगीतप्रेमी आणि कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

               धर्मा शेठ तोडेकर हे संगीतप्रेमी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. भजन आणि सांगीतिक कार्यक्रमांमध्ये त्यांना विशेष रस होता. कलाकारांना प्रोत्साहन देणे, त्यांना पाठबळ देणे तसेच परिसरातील सांगीतिक कार्यक्रमांच्या आयोजनात योगदान देणे, ही त्यांची वैशिष्ट्ये होती. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांची आवर्जून उपस्थिती असायची. सरपंचपदाच्या माध्यमातून त्यांनी गावाच्या विकासासाठीही कृतिशील योगदान दिले होते.

           त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील कलाकारांचा आधार आणि गावाच्या विकासासाठी कार्य करणारे व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Comment

Comments

Deepesh Thakur
2026-10-27 10:01:16

Baunpurn sradhanjali