‘कमवा आणि शिका’च्या संस्कारातून घडलेले रामशेठ ठाकूर समाजसेवेचे आदर्श
मुंबई : संघर्ष, कष्ट आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर विविध क्षेत्रांत ठसा उमटविणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रदीर्घ कार्याचा ‘शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने’ सन्मान करण्यात आला. मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर येथे ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या सोहळ्यात खासदार शरद पवार यांच्या हस्ते आणि प्रतिभाताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
समाजसेवा, शिक्षण, क्रीडा, कला, संस्कृती, रोजगार आणि सार्वजनिक जीवनातील त्यांच्या योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचा जीवनप्रवास रयत शिक्षण संस्थेच्या संस्कारांशी जोडलेला असल्याचे सांगितले. ‘कमवा आणि शिका’च्या संस्कारातून रामशेठ ठाकूर घडले असून, त्यांची खरी ओळख कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांतून घडलेला विद्यार्थी अशी आहे, असे पवार म्हणाले. रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रामशेठ ठाकूर यांचे योगदान मोलाचे असून, संस्थेला त्यांचे सातत्यपूर्ण पाठबळ लाभत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अत्यंत सामान्य परिस्थितीतून वाटचाल सुरू करत त्यांनी व्यवसाय, समाजकारण, शिक्षण आणि राजकारणात आपले स्थान निर्माण केले. शिक्षकाची नोकरी करत असताना सिडकोचे दहा हजार रुपयांचे पहिले काम मिळाले; मात्र ते स्वीकारण्यासाठी घरातील दागिने गहाण ठेवण्याची वेळ आली होती. कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी हे काम यशस्वी केले आणि त्यातून व्यवसायाची पायाभरणी झाली. पुढे भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विविध आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. जमीन, रोजगार, घरे, साडेबारा टक्के योजना आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी त्यांनी संघर्ष केला. या संघर्षातून निर्माण झालेल्या जनविश्वासाच्या बळावर त्यांनी दोन वेळा खासदार म्हणून लोकसभेत प्रतिनिधित्व केले.
वयाच्या ५२व्या वर्षी निवडणुकीच्या राजकारणापासून दूर होत त्यांनी समाजकार्यासाठी अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर शिक्षण, आरोग्य, क्रीडा, कला, संस्कृती आणि सामाजिक मदतीच्या क्षेत्रात त्यांच्या कार्याचा विस्तार झाला. रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक सुविधांसाठी त्यांनी १३५ कोटी रुपयांहून अधिक मदत केल्याचे यावेळी सांगण्यात आले. आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, यासाठी त्यांनी सातत्याने मदतीचा हात पुढे केला. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरजू कुटुंबांना सहाय्य, आरोग्यविषयक उपक्रम आणि सामाजिक कार्याला पाठबळ दिले जाते. क्रीडापटूंना संधी, कलाकारांना व्यासपीठ आणि तरुणांना प्रोत्साहन देण्याचे कामही त्यांच्या माध्यमातून सातत्याने झाले आहे. पद आणि सत्ता यापेक्षा समाजाशी असलेले नाते महत्त्वाचे मानत त्यांनी सर्वसामान्यांशी असलेला संपर्क कायम जपला. गरजूंच्या अडचणी समजून घेऊन शक्य ती मदत करण्याची त्यांची कार्यपद्धती त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विशेष ओळख ठरली आहे.
या सोहळ्यास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, जे. एम. म्हात्रे, वाय. टी. देशमुख, अविनाश कोळी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. महापौर नितीन पाटील, कामगार नेते महेंद्र घरत, परेश ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, अमोघ ठाकूर, पूनम ठाकूर यांच्यासह ठाकूर कुटुंबीयांचीही उपस्थिती होती. संघर्षातून कर्तृत्व, कर्तृत्वातून नेतृत्व आणि नेतृत्वातून समाजसेवा असा रामशेठ ठाकूर यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. समाजाने आपल्याला दिलेले समाजाला परत करण्याच्या भावनेतून त्यांनी उभे केलेले सेवाकार्यच त्यांच्या जीवनगौरवाचे खरे वैशिष्ट्य ठरले आहे.