शिंपल्यांचा चुना आणि खनिजांचा चुना यांविषयीचे धर्मशास्त्रीय शंकासमाधान !

🕒 05-10-2026 06:03 AM | Prabhat Parv News

प्रस्तावना : हिंदु धर्मात चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्कंद पुराण, धर्मसिंधु आणि निर्णयसिंधु यांसारख्या धर्मग्रंथांमध्ये चातुर्मासाचे नियम (चातुर्मास धारिका) आणि व्रते सविस्तर सांगितली आहेत. या काळात ‘अहिंसा’, ‘साधना’ आणि ‘शुद्धता’ पाळण्यावर विशेष भर दिला जातो. याच अनुषंगाने ‘प्राण्यांच्या हाडांपासून बनवलेला चुना वर्ज्य करावा’, असा नियम येतो. यामागील शास्त्रीय, आयुर्वेदीय आणि धर्मशास्त्रीय आधार खालीलप्रमाणे स्पष्ट करणारा हा लेख.

१. प्राण्यांच्या हाडांपासून खरोखरच चुना बनतो का? : बाजारात मिळणारा आणि पानासोबत खाल्ला जाणारा बहुतांश सामान्य चुना हा समुद्रातील शिंपले, शंख आणि गोगलगाईची कवचे जाळून आणि त्यावर प्रक्रिया करून सिद्ध केला जातो.

१ अ. आयुर्वेदीय संदर्भ : आयुर्वेदामध्ये चुन्याला ‘सुधा’ किंवा ‘चूर्ण’ असे म्हटले जाते. ‘रसतरंगिणी’ (आयुर्वेदीय रसशास्त्राचा महत्त्वाचा ग्रंथ - तरंग ११) आणि ‘भावप्रकाश’ या ग्रंथांमध्ये चुन्याचे (कॅल्शियमचे) स्रोत स्पष्टपणे विभागून सांगितले आहेत. आयुर्वेदात या प्रकारच्या चुन्याला ‘शंख भस्म’ अथवा ‘शुक्ती भस्म’ म्हटले जाते.

१ आ. धर्मशास्त्रीय दृष्टीकोन : शंख आणि शिंपले हे समुद्री जीवांचे बाह्य कवच किंवा सांगाडा (एक प्रकारची अस्थी/हाडेच) असतात. त्यामुळे या प्रक्रियेतून मिळणारा चुना हा ‘प्राणिजन्य’ मानला जातो. ‘धर्मसिंधु’ ग्रंथातील ‘चातुर्मास व्रत निर्णय’ प्रकरणामध्ये जे ‘वर्ज्य पदार्थ’ सांगितले आहेत, त्यात प्राण्यांच्या अस्थी, मांस आणि त्यासंबंधित सर्व गोष्टी निषिद्ध मानल्या आहेत. शिंपल्यांपासून बनलेला चुना हा प्रत्यक्ष जलचर प्राण्यांच्या शरीराचा भाग (कवच/हाड) जाळून बनत असल्याने, सूक्ष्म हिंसेचा दोष टाळण्यासाठी तो चातुर्मासात वर्ज्य सांगितला आहे.

२. शुद्ध (शाकाहारी) चुना (खनिज चुना) कसा ओळखावा? : शिंपल्यांचा चुना आणि खनिजांचा चुना यातील फरक केवळ डोळ्यांनी बघून ओळखणे कठीण असते. अशा वेळी व्यावहारिक आणि शास्त्रसंमत उपाय म्हणजे ‘दगडी चुना’ वापरणे.

२ अ. आयुर्वेदीय संदर्भ: आयुर्वेदामध्ये खाणीतून किंवा खडकांपासून मिळणार्‍या या खनिज चुन्याला ‘खटिका’ किंवा ‘दग्धपाषाण’ असे म्हटले जाते. हा चुना चुनखडीच्या (कॅल्शियम कार्बोनेट) खडकांपासून बनवला जातो आणि तो पूर्णपणे ‘खनिज’ स्वरूपाचा म्हणजेच शुद्ध शाकाहारी असतो. त्यामुळे बाजारातील तयार पुड्या घेण्यापेक्षा ओळखीच्या किराणा दुकानदाराकडून किंवा आयुर्वेदिक औषधालयातून आवर्जून ‘खड्याचा किंवा दगडी चुना’ (खटिका) मागून घ्यावा.

 ३. देवाला तांबूल (विडा) अर्पण करताना काय काळजी घ्यावी? : ‘आगम शास्त्र’ आणि पूजाविधीनुसार (उदा. पूजा प्रकाश, निर्णयसिंधु) देवाला षोडशोपचार पूजेच्या शेवटी ‘तांबूल’ (विडा) अर्पण करणे, हा एक महत्त्वाचा उपचार आहे. जर चुन्याच्या शुद्धतेबाबत शंका असेल, तर धर्मशास्त्राला अनुसरून खालील पर्याय स्वीकारता येतात.

३ अ. खटिका (दगडी चुन्याचा) वापर करणे : स्वतः खात्री करून दगडी चुना (खनिज चुना) आणला असेल, तर तो लावून देवाला नेहमीप्रमाणे तांबूल अर्पण करण्यास धर्मशास्त्रानुसार कोणताही अडथळा नाही.

३ आ. सुका विडा (केवळ पान-सुपारी) अर्पण करणे : धर्मशास्त्राचा एक सामान्य नियम असा आहे की, देवाला अशुद्ध वस्तू अर्पण करण्यापेक्षा ती वस्तू वगळणे केव्हाही अधिक श्रेयस्कर ठरते. जर शुद्ध दगडी चुना उपलब्ध नसेल आणि बाजारात मिळणार्‍या चुन्याबद्दल शंका असेल, तर देवाला चुन्याशिवाय ‘सुका तांबूल’ अर्पण करावा. विड्याच्या पानांवर (नागवेलीची पाने) फक्त पुगीफळ (सुपारी), लवंग, वेलची आणि काथ ठेवून तो देवाला अर्पण करावा.

३ इ. पूजेमध्ये भावाचे महत्त्व : ईश्वरी उपासनेत बाह्य उपचारांपेक्षा भक्ताचा अंतरीचा ‘भाव’ सर्वाधिक महत्त्वाचा असतो. शास्त्र सांगते, ‘भावो हि विद्यते देवः तस्मात् भावो हि कारणम् ।’ अर्थात देव हा भावाचा भुकेला असतो. अजाणतेपणी अशुद्ध (प्राणिजन्य) चुना देवाच्या चरणी जाण्यापेक्षा, शुद्ध भावनेने केवळ पान-सुपारीचा विडा अर्पण केल्यास देव तो तितक्याच प्रेमाने स्वीकारतो.

           तात्पर्य, चातुर्मासातील नियम हे भक्तांना कर्मकांडात अडकवण्यासाठी नसून त्यांच्या आचरणात सात्त्विकता रुजावी यासाठीच योजलेले असतात. त्यामुळे उद्देशानुसार कृती व्हावी.

- श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था

Leave a Comment

Comments

शिंपल्यांचा चुना आणि खनिजांचा चुना यांविषयीचे धर्मशास्त्रीय शंकासमाधान !
05 Oct 2026
पितृपक्ष आणि श्राद्धविधी करण्याचे महत्त्व
26 Sep 2026
शिक्षणव्यवस्था वाचवण्यासाठी पनवेलमध्ये ‘शाळा वाचवा’चा नारा
21 Sep 2026
खारघरकरांसाठी शासकीय वैद्यकीय योजनांबाबत मार्गदर्शन
21 Sep 2026
वायू व जलप्रदूषण रोखण्यासाठी शासनाकडून समिती स्थापन
16 Sep 2026
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
13 Sep 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व आणि श्रीकृष्णाची उपासना
03 Sep 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व आणि श्रीकृष्णाची उपासना
03 Sep 2026
शिवसेना शिष्टमंडळाकडून प्रत्यक्ष सर्वेक्षण; आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत गंभीर प्रश्न उपस्थित
01 Sep 2026