खारघरकरांसाठी शासकीय वैद्यकीय योजनांबाबत मार्गदर्शन
खारघर : श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक मंडळ, स्पॅगेटी, खारघर यांच्या वतीने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध वैद्यकीय योजनांबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खारघर-तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश रानवडे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, मंत्रालय यांच्या समन्वयातून हा कार्यक्रम पार पडला.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, मंत्रालय येथील वैद्यकीय समन्वयक डॉ. निखील इंगळे यांनी विविध शासकीय वैद्यकीय योजनांची पात्रता, लाभ, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी खारघरकरांनी विविध योजनांसंदर्भात प्रश्न विचारले. डॉ. इंगळे यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमाला श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख पदाधिकारी रविंद्र मानकर, महेश चव्हाण यांच्यासह व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच खारघर-तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने डॉ. बासूतकर आणि आनंद ज्ञाने यांनी उपस्थिती लावली.
नागरिकांना शासकीय वैद्यकीय योजनांची माहिती मिळावी आणि गरजू रुग्णांना योग्य वेळी वैद्यकीय मदत मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले. यावेळी मंडळाची व्यवस्थापन समिती, मंगेश रानवडे आणि डॉ. निखील इंगळे यांचे आभार मानण्यात आले
.