खारघरमध्ये २३ नोव्हेंबरपासून भव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव व विश्वशांती महायज्ञाचे आयोजन
खारघर : खारघर आणि नवी मुंबईतील जैन समाजासाठी आध्यात्मिक पर्वणी ठरणारा श्री १००८ श्री मज्जिनेंद्र जिनबिंब पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव आणि विश्वशांती महायज्ञाचे आयोजन २३ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. खारघर येथील श्री दिगंबर जैन चौबीसी जिनालयाच्या वतीने आयोजित या सात दिवसीय महोत्सवाला जैन साधू-संतांचे सान्निध्य आणि आशीर्वाद लाभणार आहेत.
या महोत्सवाला परमपूज्य आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज, नवाचार्य श्री १०८ समयसागरजी महाराज आणि मुनिपुंगव श्री १०८ सुधासागरजी महाराज यांचे मंगल आशीर्वाद लाभले आहेत. तसेच मुनिश्री १०८ अजितसागरजी महाराज ससंघ, मुनिश्री १०८ विदितसागरजी महाराज आणि ऐलक श्री १०५ विजितसागरजी महाराज यांचे सान्निध्य लाभणार आहे. प्रतिष्ठाचार्य बाल ब्रह्मचारी श्री प्रदीप भैयाजी 'सुयश' (अशोकनगर, मध्य प्रदेश) यांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी पार पडणार आहेत.
सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता मंगलाष्टक, दिग्बंधन, रक्षामंत्र, शांतिमंत्र, जिनाभिषेक आणि शांतिधारेने महोत्सवाची सुरुवात होईल. सकाळी ७.३० वाजता जुन्या मंदिरातून भव्य मंगल घटयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता ध्वजारोहण, मंडपशुद्धी, मंडलशुद्धी, मंडप प्रतिष्ठा आणि जिनबिंब स्थापना आदी धार्मिक विधी पार पडतील. यावेळी मुनिराजांचे मंगल प्रवचनही होणार आहे.
पुढील सात दिवसांत गर्भकल्याणक, जन्मकल्याणक, तपकल्याणक, ज्ञानकल्याणक आणि मोक्षकल्याणक या पंचकल्याणकांशी संबंधित विविध धार्मिक विधी, भव्य शोभायात्रा, अभिषेक, पूजन, सांस्कृतिक कार्यक्रम, महाआरती आणि विश्वशांती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २९ नोव्हेंबर रोजी गजरथ महोत्सवाच्या भव्य सात फेऱ्यांनी या सोहळ्याची सांगता होणार आहे.
हा महोत्सव खारघर सेक्टर २१ मधील प्लॉट क्रमांक ४२, एपीजे स्कूलजवळील सचिन तेंडुलकर क्रीडा मैदान येथे होणार आहे. खारघर दिगंबर जैन सेवा ट्रस्ट (KDJST) आयोजित या महोत्सवाला खारघर व नवी मुंबईतील जैन समाज, महिला मंडळ, खारघर दिगंबर जैन युवा संघ तसेच विविध धार्मिक पाठशाळांचे सहकार्य लाभत आहे, अशी माहिती ट्रस्टचे माजी सचिव सचिन शहा यांनी दिली.