कासाडी नदी प्रदूषणमुक्तीसाठी निर्णायक पावलं; १७.५० कोटींच्या कामांना मंजुरीसाठी यंत्रणांची संयुक्त पाहणी

प्रभात पर्व न्यूज - Published: 14-May-2025 08:08 pm

तळोजा : कासाडी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी निर्णायक टप्प्यावर काम सुरू झाले असून, पनवेल महानगरपालिकेने या प्रकल्पासाठी १७.५० कोटी रुपयांचे काम मंजूर केले आहे. या अनुषंगाने नदी परिसराची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), पनवेल महानगरपालिका, वनखाते, महसूल विभाग व आर्किटेक्ट यांचे प्रतिनिधी १४ मे रोजी सकाळी ८.३० वा. नदी परिसरात एकत्र आले. माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी राष्ट्रीय हरित लवादात (एनजीटी) दाखल केलेल्या याचिकेनंतर सुरू झालेल्या या प्रक्रियेला खऱ्या अर्थानं वेग आला आहे. त्यामुळे अरविंद म्हात्रे यांचा लढा यशस्वी ठरला आहे.

                 या पाहणीचे आयोजन राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (NGT), नवी दिल्लीच्या ८ एप्रिल २०२४ रोजीच्या आदेशानुसार करण्यात आले रायगड जिल्हाधिकारी कार्यालय आणि गृह विभागाच्या पत्रव्यवहारानुसार संबंधित विभागांनी प्रदूषण नियंत्रणासाठी एकत्रित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतून वाहणाऱ्या कासाडी नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पासंबंधी विभागीय समन्वय राखत, नदी परिसरातील व नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाची पातळी तपासण्याचे ठरवण्यात आले. यासाठी ८ मे रोजी बैठकही घेण्यात आली होती. या पुढील टप्प्यात पनवेल महानगरपालिका व अन्य यंत्रणा एकत्रितपणे कार्यवाही करत नदी शुद्धीकरणाचे काम मार्गी लावणार आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.


इतर बातम्या