गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी पनवेल व नवी मुंबई महापालिका आयुक्तांचा तिसरा क्रमांक

प्रभात पर्व न्यूज - Published: 01-May-2025 12:35 pm

मुंबई : राज्यात महायुती सरकारच्या स्थापनेनंतर शासनाने धोरणात्मक कार्यक्रमांची अंमलबजावणी वेगाने सुरू केली असून, १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) मार्फत अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यमापनात वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर अशा १० प्रमुख निकषांवर आधारित कामगिरीचे मूल्यांकन झाले.  

          या मूल्यमापनात पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे आणि नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची संयुक्त कामगिरी राज्यभरात तिसऱ्या क्रमांकावर ठरली आहे. यामध्ये उल्हासनगर महापालिका आयुक्त पहिल्या तर पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त दुसऱ्या स्थानावर आहेत. शहरी सुविधांची सुधारणा, नागरिकांसाठी सुलभ सेवा, आणि तांत्रिक अंमलबजावणीमध्ये या दोन्ही महापालिकांनी उल्लेखनीय प्रगती साधली आहे.

           उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये पाच मंत्रालयीन सचिव, पाच आयुक्त, पाच जिल्हाधिकारी, पाच पोलीस अधीक्षक, पाच जिल्हा परिषद सीईओ, चार महापालिका आयुक्त, तीन पोलीस आयुक्त, दोन विभागीय आयुक्त आणि दोन पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक यांचा समावेश आहे. या यशाबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'X' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून अधिकृत माहिती देत दोन्ही आयुक्तांचे अभिनंदन केले. हे यश शहरी प्रशासनाच्या गुणवत्तापूर्ण व पारदर्शक कारभाराचे प्रतीक असल्याचे मानले जात आहे.


इतर बातम्या