रस्ता सुरक्षा अभियान: वाहतूक नियम जागरूकतेसाठी पनवेल 'आरटीओ'चा पुढाकार
प्रभात पर्व न्यूज - Published: 29-Jan-2025 03:36 pm
तळोजा : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल (आरटीओ), फाईव्ह स्टार मोटर स्ट्रेनींग स्कूल आणि ग्लोबल मोटर ट्रेनिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात आणि कार्यक्षेत्रात रस्ता सुरक्षा अभियान राबवले जात आहे. या अभियानाअंतर्गत शालेय मुलांसाठी रस्ता सुरक्षा विषयक विविध उपक्रम राबवण्यात आले.
शहरासह जिल्ह्यात वाढते अपघात आणि वाहनचालकांचा निष्काळजीपणा यामुळे निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळावे आणि नागरिकांनी तसेच वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तळोजा येथील काळसेकर इंग्लिश स्कूलमध्ये रस्ता सुरक्षा अभियान आणि जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला. मोटार वाहन निरीक्षक विकास माळवे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात तळोजा येथील शाळेतील विद्यार्थी, वाहनचालक, तसेच ऑटोरिक्षा व टॅक्सीचालक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
आजवरच्या अनुभवांवरून अपघातांमध्ये अनेकदा कुटुंबातील कर्ता पुरुषाचा अकाली मृत्यू होतो, आणि याचा सर्वाधिक परिणाम कुटुंबातील लहान मुले व वयोवृद्ध आई-वडिलांच्या जीवनावर होतो. विद्यार्थीदशेतच मुलांना वाहतूक संस्कार मिळावेत, वाहतूक नियम समजावेत, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील वाहनचालकांना हेल्मेट व सीटबेल्ट वापरण्याची आठवण त्यांनी करून दिल्यास समाजावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. या हेतूने, शाळकरी मुलांना मार्गदर्शन करताना सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती विजया चामे यांनी अल्पवयीन मुलांनी लायसन्सशिवाय वाहन चालवू नये, असे आवाहन केले. तर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मल्हारराव शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याची प्रतिज्ञा दिली.
पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक आरिफ शेख यांनी शालेय बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय बससंबंधी नियमावलीची माहिती दिली. तसेच सायकल व पायदळ येणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देत, त्यांनी पालकांना देखील वाहतूक नियम पाळण्याचा आग्रह करण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत या अभियानात सहभाग घेतला. रस्ता सुरक्षा विषयावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीताने सर्वांचे लक्ष वेधले. तसेच, तळोजा शहरात प्रभात फेरीद्वारे वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्ये दिली, तसेच अपघातांच्या दुष्परिणामांवर चित्रे रेखाटून समाजात जागरूकता निर्माण केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, त्यांनी आपल्या पालकांना नियमांचे पालन करण्यासाठी प्रेरित करण्याचा निर्धार केला आहे.
