तळोजे मजकूर शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा कोतवाल, उपशिक्षक रामदास गायकर यांचा सन्मान
प्रभात पर्व न्यूज - Published: 27-Jan-2025 07:51 am
तळोजा : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघातर्फे तळोजे मजकूर शाळेच्या पदोन्नती मुख्याध्यापिका मनीषा कोतवाल यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर उपशिक्षक रामदास गायकर यांना विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. या सन्मानामुळे शाळेचा नावलौकिक अधिकच उंचावला असून, शाळेचा आत्मविश्वास वाढला आहे.
रायगड जिल्हा परिषद, अलिबाग शिक्षण विभागातर्फे आयोजित तालुकास्तरीय क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा २०२४-२५ मध्ये तळोजे मजकूर शाळेच्या विद्यार्थ्यांनी गायन विभागात प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय, बीटस्तरीय स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी आपली चमक दाखवली. या यशामध्ये मुख्याध्यापिका मनीषा कोतवाल यांनी घेतलेले अथक प्रयत्न आणि उपशिक्षक रामदास गायकर यांचे प्रभावी मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. विद्यार्थ्यांच्या आणि शाळेच्या या यशाची दखल घेत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघातर्फे तळोजे मजकूर शाळेच्या पदोन्नती मुख्याध्यापिका मनीषा कोतवाल यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, उपशिक्षक रामदास गायकर यांना संस्थेच्या वतीने विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे शाळेचा आत्मविश्वास वाढला असून, मुख्याध्यापिका मनीषा कोतवाल आणि उपशिक्षक रामदास गायकर यांचे सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

