तळोजा ॲडव्होकेट अकादमी अँड रिसर्च सेंटरच्या इमारतीचे २८ सप्टेंबर रोजी भूमिपूजन

प्रभात पर्व न्यूज - Published: 27-Sep-2024 09:38 am

मुंबई : महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने नवी मुंबईतील तळोजा येथे उभारण्यात येत असलेल्या देशातील पहिल्या ॲडव्होकेट अकादमी ॲन्ड रिसर्च सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन २८ सप्टेंबरला डी.वाय.पाटील विद्यापीठ, नेरूळ येथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण.आर. गवई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असल्याची माहिती, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष संग्राम देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

       नवोदित वकिलांना कायद्याचे प्रशिक्षण देण्यासाठी तसेच कायदा विषयावर संशोधन व्हावे, यासाठी ॲडव्होकेट अकादमी ॲन्ड रिसर्च सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. तळोजा एमआयडीसी येथे दोन एकर क्षेत्रात ही अकादमी असून ५० हजार चौ. फुट जागेवर इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीमध्ये ७०० वकिलांना बसता येईल असे सुसज्ज सभागृह, तीनशे वकिलांची राहण्याची सोय तसेच १०० ते १५० वकिलांना एकाच वेळी प्रशिक्षण देण्यासाठी पाच ते सात वर्ग असणार आहेत. या अकादमीत तरुण वकिलांना ज्येष्ठ वकिलांचे मार्गदर्शन मिळणार आहे. राज्यातील सर्व विधी महाविद्यालये या अकादमी सोबत जोडली जाणार आहेत. ही अकादमी महाराष्ट्र, गोवा, दिव-दमण येथील वकिलांसाठी उच्च दर्जाचे कायदेविषयक प्रशिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात मोलाची भूमिका बजावण्यात प्रोत्साहन देणार आहे, असेही संग्राम देसाई यांनी यावेळी सांगितले.

          या अकादमीत जे विद्यार्थी वकिली क्षेत्रात नवोदित असतील त्यांच्यासाठी प्रशिक्षण देण्याची सोय असणार आहे. विविध आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणाऱ्या या अकादमीसाठी राज्य शासनाने जागा उपलब्ध करून दिली आहे. भूमीपूजन सोहळ्यास महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, गोव्याचे महाधिवक्ता देविदास पांगम, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा आणि उपाध्यक्ष एस. प्रभाकरन आदीही उपस्थित राहणार आहेत, असेही ॲड. देसाई यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष विवेकानंद घाडगे उपस्थित होते.


इतर बातम्या


Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement

Advertisement