सिडकोच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांची नियुक्ती
प्रभात पर्व न्यूज - Published: 16-Sep-2024 08:13 pmमुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिडको अध्यक्षपद रिक्त होते. अखेर संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने आपल्या नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार, सरकारने मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या आमदार संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी, तर लोकसभा निवडणुकीत उमेदवारी कापलेल्या हेमंत पाटील यांची वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. सरकारने या दोघांनाही मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. तसेच माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचीही राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.