तळोजा औद्योगिक वसाहती व बँकांमध्ये 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण' योजना राबविण्याविषयी आयुक्तांच्या सूचना
प्रभात पर्व न्यूज - Published: 23-Aug-2024 09:05 amपनवेल : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण' योजनेच्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेत औद्योगिक वसाहत तळोजा आणि विविध बँकांमध्ये युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान महानगरपालिका आयुक्त श्री. मंगेश चितळे यांनी भूषवले.
या बैठकीत उपायुक्त संतोष वारूळे, उपायुक्त बाबासाहेब राजळे, समाजविकास अधिकारी स्वप्नाली चौधरी, डेएनयुएलएम व्यवस्थापक विनया म्हात्रे, नवनाथ थोरात, तसेच औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांचे आणि बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या 'रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम' अंतर्गत 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण' योजना राबविण्यात येत आहे. या योजनेद्वारे युवकांची क्रयशक्ती विधायक मार्गाने वापरण्याचा उद्देश असून, युवकांच्या भविष्यातील प्रगतीसाठी प्रशिक्षण कालावधी महत्वाचा ठरणार आहे. या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन मिळणार असून, बारावी पास, आयटीआय मधील विविध ट्रेड, पदविका, पदवी, पदव्युत्तर युवकांना विविध कंपन्या, बँका, व बांधकाम क्षेत्रांमध्ये सहा महिन्यांसाठी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.
यावेळी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील कला कौशल्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त अमिता पवार यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यात आला. त्यांनी आस्थापनांना लवकरात लवकर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत आवाहन केले आणि 'महास्वयं' पोर्टलवर नोंदणी करण्याची माहिती दिली.
बैठकीत 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेची अंमलबजावणी करताना कोणतीही रक्कम वजा न करता संपूर्ण लाभ देण्याबाबत शासनाच्या आदेशाची माहिती देण्यात आली. तसेच पीएमस्वनिधी अंतर्गत बँकांनी लाभार्थ्यांना सहकार्य करण्याची सूचना देण्यात आली आणि पेडिंग प्रकरणांचा आढावा घेतला.
दरम्यान, पनवेल शहराला उद्यानाचे शहर बनविण्याच्या दृष्टीने बँका आणि औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांनी त्यांच्या सामाजिक दायित्वाच्या (सीएसआर) माध्यमातून सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले.