खारघर ज्वेलर्स दरोडा प्रकरण: नवी मुंबई गुन्हे शाखेची धडक कारवाई, चार आरोपींना अटक
प्रभात पर्व न्यूज - Published: 16-Aug-2024 08:52 pmनवी मुंबई : खारघर येथील बी. एम. ज्वेलर्समध्ये २८ जुलै रोजी रात्री ९-१० च्या सुमारास झालेल्या दरोडा प्रकरणात नवी मुंबई गुन्हे शाखेने उदयपूर, राजस्थान येथून चार आरोपींना अटक केली आहे. या दरोड्याच्या घटनेत, तीन अनोळखी व्यक्तींनी हेल्मेट घालून दुकानात प्रवेश केला आणि पिस्तूलाचा धाक दाखवून ११ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून चोरट्यांनी पळ काढला होता.
दुकानदारांनी अलार्म वाजवून मदतीसाठी आवाहन केले असता नागरिकांनी दुकानाबाहेर जमून चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला आणि दुचाकीवरून पसार झाले. या घटनेनंतर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तांत्रिक तपासाद्वारे नवी मुंबई गुन्हे शाखेने चार आरोपींची ओळख पटवली. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सुरत, गुजरात, राजस्थान आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पथके पाठवली. अखेर उदयपूर, राजस्थान येथून आरोपींना अटक करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींमध्ये रिझवान मो. अलीशेख (वय २७), अझरुद्दीन हुसोनुद्दीन शेख (वय २८), ताहा तनवीर परवेज सिंधी (वय २१) आणि राजविर रामेश्वर कुमावत (वय २०) यांचा समावेश आहे.
या अटकेदरम्यान पोलिसांनी साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल, देशी बनावटीचे दोन पिस्तुल, दोन मॅगझिन, दोन जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली एक्सेस स्कुटी जप्त केली आहे.