पुणे पूरग्रस्तांना पनवेल महापालिकेचा मदतीचा हात
प्रभात पर्व न्यूज - Published: 27-Jul-2024 06:59 pmपनवेल : पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे पुणे शहर व आसपासच्या परिसरात निवासी भाग, रस्ते व पूल, इतर अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाबरोबर मोठ्या प्रमाणात गाळ, झाडे व कचरा वाहून आल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. पनवेल महापालिकेच्यावतीने पुणे मनपाला पुरग्रस्त नागरिकांना मदतीसाठी आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार घन कचरा व आरोग्य विभागाच्यावतीने उपायुक्त डॉ.वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता पथक रवाना करण्यात आले आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील घाटमाथ्यावर गेल्या दोन तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने शहरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील अनेक रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप प्राप्त झाले, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरले, सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये कमरेइतके पाणी साठले. त्याचवेळी खडकवासला धरणातून ३५ क्युसेसपर्यंत विसर्ग वाढविल्याने पुराच्या पाण्यात वाढ झाली.
सध्या पुराचे पाणी कमी झाले असले तरी सर्वत्र चिखल, झाडाच्या फांद्या, गाळाचे साम्राज्य पसरले आहे. याची तातडीने साफसफाई करणेकामी पुणे महापालिकेस सहकार्य करण्यासाठी महापालिकेचे उपायुक्त वैभव विधाते यांच्या बरोबर मुख्य आरोग्य निरीक्षक,६ स्वच्छता निरीक्षक, १० स्वच्छता पर्यवेक्षक , २५० मनुष्यबळ , ३० फवारणी कर्मचारी रवाना झाले आहेत. यांच्याबरोबर ३०० नग मास्क, ३०० नग हात मोजे, १० स्प्रे पंप, ५ फॉगिंग मशीन, १००० किलो जंतूनाशक पावडर स्वच्छता करण्यासाठी पाठविण्यात आली आहे.