अक्षता म्हात्रे हत्येप्रकरणी तीन जणांना अटक
प्रभात पर्व न्यूज - Published: 14-Jul-2024 10:09 amनवी मुंबई : घरगुती भांडण झाल्याने बेलापूर येथील अक्षता म्हात्रे (वय ३० वर्ष) डायघर जवळील शीळ फाटा येथील मंदिरात मनःशांती मिळवण्यासाठी गेली असताना मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत तिची हत्या केली होती. या घटनेनं सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी शिळ-डायघर पोलीस प्रशासनाला त्या ३ आरोपींना पकडण्यात यश आले आहे. श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे आरोपींची नावे आहेत.
बेलापूरवरून ही महिला बेपत्ता झाली होती. सासरच्या पती आणि इतर व्यक्तींच्या ताणावामुळे ती गणेश घोळ मंदिर या ठिकाणी आली होती. मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस हे मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतले होते. ६ जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी ३० वर्षीय महिला घरगुती ताणतणाव असल्याने सकाळी १० वाजता गणेश घोळ मंदिरात मनःशांती मिळवण्यासाठी गेली होती. दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिले. त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना या चहामध्ये भांगेची गोळी मिसळून दिली. हा चहा प्यायला नंतर मुलीची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला या मंदिरातच राहिली.
दरम्यान या तीन पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. मात्र आपले बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजताच त्यांनी तिला मारहाण करत जमिनीवर आपटले आणि तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला. दोन दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला. यासंदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्याचा संशय आला. पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखीन एक आरोपी असल्याचे सांगितले. मात्र घटना पोलीस स्थानकात जाताक्षणी आरोपीने मुंबई येथे पळ काढल्याची माहिती देखील इतर दोन पुजाऱ्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला चिता कॅम्प ट्रॉम्बे येथून अटक केली. दरम्यान श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.