माझी वसुंधरा ३.० अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत पनवेल महापालिकेचा राज्यात तिसरा क्रमांक
प्रभात पर्व न्यूज - Published: 05-Jun-2023 09:56 pm
मुंबई: माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या अंतर्गत ३ ते १० लक्ष लोकसंख्येच्या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरामध्ये पनवेल महानगर पालिकेचा राज्यात तिसरा क्रमांक आला असून ५ कोटीचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
मुंबई येथे आज( ५ जून २०२३) माझी वसुंधरा ३.० सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त व अधिकारी यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. आयुक्त गणेश देशमुख यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ प्रशांत रसाळ, उपायुक्त कैलास गावडे, विठ्ठल डाके, गणेश शेटे, प्रकल्प कार्यकारी अभियंता संजय काटेकर यांच्या समवेत पुरस्कार स्वीकारला.
माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी पनवेल महापालिकेने केलेल्या कामगिरीबाबत 'पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग' आणि 'माझी वसुंधरा अभियान संचालनालय' यांच्या वतीने महापालिका आयुक्त व आधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित होते.