पनवेल महापालिकेच्या तीन नवीन नागरी आरोग्य केंद्र, चार आरोग्य वर्धिनी उपकेंद्रांचे उद्घाटन
प्रभात पर्व न्यूज - Published: 21-Apr-2023 06:40 pm
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना प्राथमिक उपचारांच्या उत्तम सुविधा मिळण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेच्यावतीने रोहिंजण, पालेखुर्द, भिंगारी येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच खारघर सेक्टर-१२, कोयनावळे, पडघे, टेंभोंडे येथील आरोग्य वर्धिनी उपकेंद्राचे आज (शुक्रवार, २१ एप्रिल) उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त गणेश देशमुख, आरोग्य सेवा मुंबई मंडळ ठाणे सहाय्यक संचालक डॉ. चाकुरकर, उपायुक्त सचिन पवार, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी आणि माजी नगरसेवक, माजी नगरसेविका उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर मातांना मोफत सोनोग्राफी सुविधा देण्यासाठी सहा सोनोग्राफी सेंटर सोबत सामंजस्य करार करण्यात आले. तसेच गरोदर मातांमधील रक्तक्षय असलेल्या मातांना मोफत रक्त व रक्तघटक देण्याच्या दृष्टीने दोन रक्तपेढ्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. याशिवाय संशयित क्षयरुग्णांचे मोफत डिजिटल एक्स-रे चाचण्या करण्यासाठी पाच एक्स-रे सेंटर सेाबत सामंजस्य करार, पालिका हद्दीतील पॅथालॉजी सेंटरची ऑनलाईन नोंदणी करिता नविन संकेतस्थळाचे प्रक्षेपण, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे मशीनद्वारे निदान करणाऱ्या सेवा पुरवठाधारकाशी सामजंस्य करारमुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या स्वाक्षरीने करण्यात आले. तसेच यावेळी पालिका हद्दीतील पॅथालॉजी सेंटरची ऑनलाईन नोंदणीच्या संकेतस्थळाचे प्रात्यक्षिक देण्यात आले.

