पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकापच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची सत्ता निश्चित
प्रभात पर्व न्यूज - Published: 07-Apr-2023 06:49 pmपनवेल : वर्षानुवर्षे शेकापती सत्ता असलेल्या पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा शेकाप आणि मित्रपक्षाची म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. कारण, बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण १८ जागांपैकी भाजपने केवळ तीनच अर्ज भरले होते आणि त्यापैकी दोन अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीचे ७ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. याशिवाय शेकापमध्ये बंडखोरी झाली असून राजेंद्र पाटील, संतोष पाटील यांच्यासह अन्य जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बाजार समितीची निवडणूक ३० एप्रिल रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २० एप्रिल आहे. तोपर्यंत आणखी कोण अर्ज मागे घेतो आणि किती उमेदवार बिनविरोध निवडून येतात, याकडे लक्ष लागले आहे.
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक होत असून यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे ५, शिवसेना ठाकरे गटाचा १ आणि काँग्रेसचा १, असे ७ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये शेकापचे देवेंद्र पाटील, सुभाष पाटील, सुनील सोनवणे, सखाराम पाटील, ललिता गोपीनाथ फडके हे पाच तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रताप हातमोडे, काँग्रेसचे रामचंद्र पाटील, असे एकूण सात सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपच्या तीन पैकी महेश पाटील आणि आनंद ढवळे यांचे अर्ज बाद झाले असून पंढरीनाथ ठाकूर हे एकच उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शेकापच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची सत्ता राहणार असल्याचे निश्चित झाले असून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.