बेवारस मृतदेहाबाबत संपर्क साधण्याचे तळोजा पोलिसांचे आवाहन
प्रभात पर्व न्यूज - Published: 06-Apr-2023 03:51 pm
तळोजा : तळोजा पोलीस स्टेशनच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी आढळलेल्या बेवारस मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध सुरू असून काही माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धरणा कँप येथील शिवसेना शाखेच्या गेटजवळ १६ जानेवारी रोजी अनोळखी बेवारस महिला बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. सदर महिलेस उपचारासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. तळोजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वय अंदाजे ५० ते ५५, रंग सावळा, अंगाने मध्यम, चेहरा उभट, अंगात मेहंदी रंगाचा शर्ट, मरून रंगाची हाफ पँट, अशा वर्णनाच्या या महिलेचे नाव, पत्ता याबाबत कुठलीही माहिती उपलब्ध झाली नसून तळोजा पोलीसांकडून मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे.
याशिवाय तळोजा पोलिस स्टेशनच्या हद्दीत २ फेब्रुवारी रोजी तळोजा फेज-२ येथील बी. जी. शिर्के, बांधकाम साईटवरील ६ च्या ११ व्या माळ्यावर रूम नंबर ११०६ च्या हॉलमध्ये एक अनोळखी इसम गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळला होता. सदर इसमाला पनवेल उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीचे वय अंदाजे २४ वर्ष असून रंगाने सावळा, अंगाने मध्यम, उभट चेहरा असलेल्या या मयत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. याविषयी काही माहिती मिळाल्यास ०२२-२७४१२३३३ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन तळोजा पोलीसांनी केले आहे.