खोपोली येथील हिंदु राष्ट्र जागृती सभेत पंचक्रोशीतील धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग
प्रभात पर्व न्यूज - Published: 27-Mar-2023 03:30 pmखोपोली : 'भारताची फाळणी धर्माच्या आधारावर झाली, मग हे राष्ट्र निधर्मी कसे ? भारत हिंदु राष्ट्र हवे होते; परंतु 'सेक्युलर' (निधर्मी ) म्हणून घोषित करण्यात आले. धार्मिक अधिष्ठान असलेले राष्ट्र निधर्मी असू शकत नाही. हिंदु राष्ट्र हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. देशाची वाटचाल हिंदु राष्ट्राकडे होत आहे ! वर्ष २०२५ चा गुढीपाडवा आपण हिंदु राष्ट्रात साजरा करू', असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक सुनील घनवट यांनी खोपोली येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले. हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने खोपोली येथील श्री समर्थ मंगल कार्यालयात या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला खोपोली शहर आणि ग्रामीण पंचक्रोशीतील हिंदू धर्मप्रेमी सहभागी झाले होते. यावेळी सनातन संस्थेच्या धनश्री केळशीकर, हिंदु जनजागृती समितीचे प्रसाद वडके या वक्त्यांनींही संबोधित केले.
सुनील घनवट पुढे म्हणाले, 'रायगड जिल्ह्यात खोपोलीसह विविध भागात ख्रिस्ती मिशनरी आमिष दाखवून हिंदूंचे धर्मांतर करत आहेत तसेच रायगड जिल्ह्यातील विविध गड-दुर्गावर धर्मांधांद्वारे अतिक्रमणे होत आहेत. लव जिहाद, हलाल जिहाद आदी अनेक आघात हिंदूंवर होत आहेत. हे सर्व रोखण्यासाठी हिंदूंनी वेळीच संघटीत होणे आवश्यक आहे'.
या सभेचा प्रारंभ कोकण धर्मशाळेचे (देवाची आळंदी) संस्थापक आणि अध्यक्ष गुरुवर्य ह.भ.प. कृष्णाजी महाराज लांबे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्ज्वलन करुन करण्यात आला. यानंतर मान्यवर वक्ते सुनील घनवट यांच्या हस्ते व्यासपीठावर विराजमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. वेदमंत्रपठणानंतर आणि उपस्थित संत, वक्ते, मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे देशभरात चालू असलेल्या व्यापक कार्याविषयी समितीचे राजेंद्र पावसकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे सतीश कोचरेकर यांनी केले. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री) अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती सभेला लाभली. वेध सह्याद्री गडदुर्ग संवर्धन, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वारकरी संप्रदाय, श्री नरेंद्राचार्य महाराज संप्रदाय, श्री गगनगिरी महाराज संप्रदाय, सकल हिंदू समाज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, सनातन संस्था आदी संघटना आणि पंचक्रोशीतील सरपंच-उपसरपंच, पंचायत समिती सदस्य आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी या सभेला उपस्थित होते.या सभेचे सभेचे थेट प्रक्षेपण फेसबुकवर http://fb.com/JagoHinduRaigad या link द्वारे करण्यात आले होते.
सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर म्हणाल्या, 'शारीरिक आणि मानसिक बळापेक्षा आध्यात्मिक बळ श्रेष्ठ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही तुळजाभवानीची उपासना करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपणही धर्माचरण करून आध्यात्मिक बळ वाढवूया. हिंदु राष्ट्राची चळवळ पुढे नेण्यासाठी आध्यात्मिक बळ आवश्यक आहे'. हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके म्हणाले, 'स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेमध्ये १०० हून अधिक पालट करण्यात आले. राज्यघटनेत 'सेक्युलर' शब्द घालण्यात आला, तर 'हिंदु राष्ट्र' शब्द का घालू शकत नाही ? आणखी एक पालट करून भारत हे 'हिंदु राष्ट्र' म्हणून घोषित करावे. हिंदु राष्ट्राची मागणी राज्यघटनेला अनुसरूनच आहे'.